शोधणाऱ्याला सापडतच !!
परवा पुण्यात ट्रॅफिक सिग्नलवरती पाहिलेली घटना
परवा पुण्यात ट्रॅफिक सिग्नलवर थांबलो होतो .अर्थात पुण्यामध्ये ती अशी काय फार मोठी घटना नाही.पण माझ्यासारख्या सातारकरासाठी ट्रॅफिक सिग्नल म्हणजे अमावास्येचा चंद्रच. तो असतो म्हणे तिथं पण मला दिसत नाही आणि जाणवतही नाही. मी सगळे थांबले कि थांबतो आणि सगळे निघाले कि निघतो. अर्थातच पुण्यात असे करून चालत नाही.तर सांगायचा मुद्दा हा कि सिग्नल वर थांबलो असताना भंगार गोळा करणारी स्त्री माझ्या शेजारी येऊन अचानक थांबली आणि रस्त्याकडे निरखून पाहू लागली. मला काहीच कळेना पण नंतर ती खाली वाकली आणि तिथं पडलेले चांदीच्या पैंजनाचे दोन तीन मणी तिनी उचलले. ते चांदीचेच आहेत ह्याची खात्री केली आणि व्यवस्तीत ठिकाणी ठेऊन हसत मुखी पुढे निघून गेली. सिग्नल सुटला आणि मीही माझ्या मार्गाने निघून गेलो.
ती घटना मनामध्ये कुठेतरी जागा करून गेली . शेकडो लोक त्या रस्त्यावरून जातात मग त्यांना हे मणी का दिसले नाहीत आणि त्या भंगार गोळा करणाऱ्या स्त्रीलाच का दिसले असा प्रश्न पडला. तिचेच डोळे इतके तीक्ष्ण होते का? नंतर विचार केल्यावर मला कळले की कोणाची नजर किती चांगली ह्यापेक्षाही काय शोधते हे महत्वाचे आहे. ती स्त्री अशाच कसल्यातरी गोष्टी शोधात होती आणि सतत तिच्या मनात कुठेतरी होत कि मला काहीतरी सापडलं पाहिजे म्हणून कदाचित शेकडोच्या गर्दीत फक्त त्याच स्त्रीला ते मणी सापडले.
ती भंगार गोळा करणारी स्त्री मला एक मोठा उपदेश देऊन गेली की मला जे हव आहे ते जर कायम माझ्या डोक्यात असेल आणि जर ते मी अखंड शोधत असेन तर शेकडोंच्या गर्दीतही ते मलाच मिळेल.मग ती कोणतीही गोष्ट असेल माझ्या भविष्यासंबंधी,भावनिक किव्वा तांत्रिक. आणि कदाचित मग मी हि त्या स्त्री सारखा हसत हसत आयुष्याच्या मार्गावर्ती पुढे जाईन.
Comments
Post a Comment